युती जाहीर, तरी अस्वस्थता कायम; जगदीश गुप्तांचा ‘वॉकआऊट’ चर्चेत
अमरावती : मागील आठ दिवसांपासून भाजप आणि शिंदेसेना युतीबाबत चाललेल्या चर्चा, बैठकी आणि वाटाघाटीनंतर सोमवारी अखेर युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून सूत्रांनुसार भाजप ४९, शिंदेसेना १७ आणि युवा स्वाभिमान ९ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. मात्र, शिंदेसेनेचे माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी बैठकीतून बाहेर पडल्यामुळे युतीत अजून काहीतरी तणाव दिसतो आहे.
शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये सोमवारी भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये युतीसंदर्भात चर्चा झाली. दुपारी २.३० वाजता शिंदेसेनेचे नेते आणि जलसंधारण मंत्री युतीसाठी गोडे वैद्यकीय महाविद्यालयाला गेले. यावेळी भाजपकडून संजय कुटे, प्रवीण पोटे पाटील, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, डॉ. नितीन धांडे, दिनेश सूर्यवंशी आणि शिंदेसेना कडून संजय रायमुलकर, अभिजित अडसूळ, श्याम देशमुख, आशिष धर्माळे उपस्थित होते. या बैठकीत अंतिम जागा वाटपाचा निर्णय झाला आणि युतीवर शिक्कामोर्तब झाला.
युतीसंदर्भात बोलणी आणि निर्णयानंतर शिंदेसेनेचे नेते ना. संजय राठोड आणि माजी आमदार संजय रायमुलकर अमरावतीला पोहोचले. त्यानंतर एका मोठ्या हॉटेलमध्ये स्थानिक नेत्यांसह बैठक झाली. यावेळी माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार अभिजित अडसूळ, ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रीती बंड, श्याम देशमुख, आशिष धर्माळे उपस्थित होते. मात्र, माजी मंत्री जगदीश गुप्ता अर्ध्या तासातच बाहेर पडले आणि त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी 'जय श्रीराम' असे म्हणत मंगळवार, ३० डिसेंबर रोजी अधिकृतपणे आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले.
What's Your Reaction?