अमरावती महापालिका निवडणूक : भाजप-शिवसेना युतीवर सस्पेन्स, १८ जागांवर चर्चा
अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युतीबाबत जोरदार चर्चा सुरू असून, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. युती झालीच तर शिवसेनेला १८ जागा देण्यावर प्राथमिक सहमती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, आमदार रवी राणा यांच्या पक्षाला युतीत स्थान नको, अशी ठाम भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आल्याने युतीवर सस्पेन्स कायम आहे.
भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये युतीसंदर्भात अनेक बैठका झाल्या असून, शेवटची महत्त्वाची बैठक २० डिसेंबर रोजी पार पडली. सुरुवातीला शिवसेनेने २५ जागांची मागणी केली होती, मात्र चर्चेनंतर १८ जागांवर तोडगा निघाल्याचे बोलले जात आहे. या १८ जागांवर कट्टर शिवसैनिकांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.
दरम्यान, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट असल्याने भाजपची कोंडी झाली आहे. युतीचा अंतिम निर्णय आज होण्याची शक्यता असून, अमरावतीच्या राजकारणात पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?